चिपी विमानतळावरुन विमानानं 'टेक-ऑफ' घेण्याआधीच माझं मन उंच आकाशात विहरू लागलं आहे - केंद्रीय मंत्री नारायण राणे
Even before the plane takes off from Chipee Airport, my mind is on the sky - Union Minister Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग चिपी विमानतळ आजच्या उद्घाटना निमित्ताने त्यांच्या मनातील भावना खालील प्रमाणे सांगितले आहेत,
" माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग याच तालुक्यातल्या नव्हे तर आसपासच्या सगळ्या भागातल्या लोकांना जगाशी जोडणारं विमानतळ काही तासातंच खुलं होत आहे. चिपी विमानतळावरुन विमानानं 'टेक-ऑफ' घेण्याआधीच माझं मन उंच आकाशात विहरू लागलं आहे. तीस वर्षं जे स्वप्न पाहिलं, ज्याचा पाठलाग केला त्याची पूर्तता आज होत असताना स्वाभाविकपणे माझं मन भूतकाळात रेंगाळतं आहे.
मला आठवतात माझ्या कोकणातले धुळीने, खड्ड्यांनी भरलेले रस्ते. पावसाळ्यात पाच-दहा मैलाचं अंतर कापणंसुद्धा मुश्किल होऊन जायचं.
एसटी आणि बंदराला लागणाऱ्या बोटी एवढाच काय तो जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग. पण त्यासाठी सुद्धा किती धडपडावं लागायचं. कोणाला शिक्षणासाठी परगावी जायचं असो. कोण्या लेकीबाळींना मुलाबाळांसह माहेराला यायचं असो. पोटाच्या ओढीनं कोणाला देशावर, मुंबईला जायचं असो की जीवाच्या दुखण्यानं आजारी पडलेल्या कोणाला औषधपाण्यासाठी दवाखाना गाठायचा असो. कोकणातला प्रवास ही मोठी अडचण होती. हिंदीत प्रवासाला 'यातायात' का म्हणतात, यावरुन ख्यातनाम साहित्यिक पु. लं. देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात खुमारीनं लिहिलं आहे. पण अशी 'यातायात' कोकणी माणसाच्या नशिबालाच पुजलेली होती.
अहो, माझ्या आजारी वडलांचं निधन वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी झालं. कशामुळं ?
माझ्या वरवडे गावातून त्यांना उपचारासाठी वेळेत हलवता आलं नाही. ना मी त्यांच्यापर्यंत मुंबईतून वेळेत पोहोचू शकलो. ते दिवस आपण प्रयत्नपूर्वक पालटवले. केवळ रस्ते नाहीत, प्रवासाच्या सुविधा नाहीत म्हणून असं जीवाचं माणूस गमवण्याची पाळी कोणावर येणार नाही. कणकवलीतही अत्यंत अद्ययावत रुग्णालय आपण उभारलं आहे.
आता मुंबईतलीच नव्हे तर अगदी जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात असलेली माझ्या कोकणातली माहेरवाशीण अवघ्या काही तासात चिपी विमानतळावर तिच्या लेकराबाळांसह, सामानसुमानासह अवघ्या काही तासात 'लँड' होईल. तीही प्रवासाचा शीण न येता. हसत. मजेत.
देवगडचा माझा आंबा-काजू उत्पादक मुंबई-दुबईत त्याच्या मालाचा व्यवहार करण्यासाठी जाऊन एक-दोन दिवसात आपल्या बागेत परत येईल.
महाराष्ट्रभर, जगभर पसरलेल्या चाकरमान्यांना गणपतीसाठी, शिमग्यासाठी काही तासात कोकणातलं घर गाठता येईल."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा