राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) जिंकण्याकडेच....
संघ दोन पातळ्यांवर तत्पर असतो ते म्हणजे एक मनोरचना आणि दूसरे राजकारण. याला त्यांनी सोयीप्रमाणे वेगवेगळी नावे दिलेली आहेत. पण चतुरस्त्र पाऊले , ही दोनच !
मनोरचना व राजकारण हे परस्परपूरक असतात. एक वाढले की दुसरेही वाढते. ही वाढ परिणामाची असते. कधी जोडीने तर कधी जोडीबाह्यही ! परिणामाशी मतलब. अशा परिणामाची परिणामकारकता रोजच्या रोज वाढतांनाच दिसते. तिथेच संघाचे जिंकणे असते.
ते कसे ? हा देश स्वतंत्र झाला तेव्हा बहुसंख्यांक हिंदूच होते. तरीही , हा देश हिंदूंचा अशी मनोरचना नव्हती. मनोरचनेची मानसिकता धर्मनिरपेक्षतेची होती. ती तशी सांभाळली गेली. लोकांनीही स्वीकारली होती. पुढे ,सांभाळणारे जात गेले. नवनवे येत गेले. गांभीर्य कमी झाले. सांभाळ आणि रुजविणे इकडे दुर्लक्ष होत गेले. सुस्ती व खुष्की वाढत गेली. मात्र , यावर एक संघटना लक्ष ठेवून होती. त्या संघटनेने या बेसावधतेत वाट भक्कम केली. प्रत्येक परिस्थितीत वा प्रतिक्रियेत , संभावना शोधली. हिंदू होतेच. आधी स्वातंत्र्यक्षणी जनसंख्या ४० कोटी होती. ती कोटीने वाढतच गेली. हिंदूही वाढत गेले. हिंदूंचे मन तेव्हढे घडवायचे होते. अनेक प्रसंगातून व प्रयत्नातून ते घडत गेले. तीच मनोरचना. महाभारत मालिकेचे ते दिवस आठवावे.
जोडीला कृतीआराखडा आखला गेला. लांगूलचालन ... आता हिंदू मार खाणार नाहीत ... गर्व से कहो हम हिंदू है ... जय भवानी , जय शिवाजी ! इतर धर्मियांना कट्टर करीत गेले. यातून , हिंदू मन तेवत .. चेवत गेले. या मनोरचनेला बहुसंख्याकतेचा आधार मिळाला. ही बहुसंख्याकता ते रुप घेऊन मतपेटीत सरकली. या सरकण्यात वाटप- वाटणी नव्हती. २०१४ ला राजकीय चमत्कार घडला. हीच चटक २०१९ ला टीकून राहीली. किंबहुना वाढली.
याचवाटे , यत्न प्रयत्न सुरू राहीले. याचेच परिणाम , पडसाद सर्वत्र दिसत आहेत. २०११ , २०१६ ला मंदिरात न जाणाऱ्या ममता बॅनर्जी मंदिर मंदिर फिरतायेत. निवडणुकीचा प्रारंभ देवीस्त्रोत्राने मंचावरून केला. मी ब्राह्मण, हिंदू असल्याचे सांगावे लागले. प्रियंका गांधीला गंगेत डुबकी मारावी लागली. राहुल गांधीचेही असेच ! गुलाम नबीने डोक्यावर भगवा चढविला. परवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नव्हे. शिवरायांचे आहे असल्याचे म्हटले. म्हणजे हिंदुत्व आहेच. यातून सुटका नाही. अशी बाध्यता आलीय. तिकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणतात , आदिवासी हिंदू नाहीत. ते कधीच हिंदू नव्हते. आम्ही हिंदू कशाला ? सोरेन धर्म लिहू. नवा धर्म कोड द्या. म्हणजे ज्यांच्यात धर्म नव्हताच ! तिथे नवा धर्म. नवा परिणाम.
याच वळणावर केरळ , तामिळनाडुची राज्य निवडणूक हिंदुत्व भोवऱ्यात अडकते की काय ? तामिळनाडुत जलिकट्टू व केरळात शबरीमाला ठाऊक असेलच. प्रयत्न तर भरपूर झाले. आसाम तर आधीच यात अडकवले आहे.
धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे हे असे होणे म्हणजे संघ जिंकण्याकडेच ... नव्हे काय ? प्रत्येक आव्हानाचे , प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अक्षर ग्रंथातच असते असे नव्हे. नवी आव्हाने.. नव्या उत्तर प्रसवतेला आतुर असतात. महापुरुषांनी दृष्टी दिलेली असतेच !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा