तालुका निहाय विकास आराखडा तयार करा : आमदार नाना पटोले - लोकराजा

Breaking News

Adsense ad

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

तालुका निहाय विकास आराखडा तयार करा : आमदार नाना पटोले

तालुका निहाय विकास आराखडा तयार करा : आमदार नाना पटोले

भंडारा - जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तालुका निहाय विकास आराखडा तयार करा, असे निर्देश आमदार नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, जिल्हा जलसंधारण अधिकारी  ए. आर. जगताप व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

घरकुल हा गोरगरीब नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. घरकुल योजनेचा लाभापासून गरीब व गरजू लाभार्थी वंचित राहू नये यासंबंधी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरकुलाचे बांधकाम करतांना जागेचा प्रश्न निर्माण होते त्याअनुषंगाने झूडपी जंगल व गावठान येथील जागा मिळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले.

उन्हाळ्याच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होते. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव तयार करा व बंद असलेल्या योजना सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. बंधारे बांधून पाणी पातळी वाढवता येईल त्याअनुषंगाने सर्व विभागांनी कार्यवाही करावी व आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात सोयाबिन पिकावर सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रादुर्भाव झाल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्यावर उपाय योजना करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. धान पिकावर खोडकिडा व इतर रोगांच्या अनुषंगाने औषधसाठा उपब्धतेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला व रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे बैठकीत सांगितले. तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आता नसला तरी पुढील काळात आल्यास त्यावर उपाय योजना करण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी दिले.

ई-पीक पाहणी, पीक विमा योजना, एमएसईबी, वन विभाग व धान खरेदी या विभागांचा सुध्दा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साकोली, लाखनी व लाखांदूर तालुका निहाय जलसंधारण अंतर्गत सिंचन आराखडा माहिती पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads